Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Sunday, November 18, 2012

हळवा 'हृदयसम्राट'!

हळवा 'हृदयसम्राट'!

http://www.loksatta.com/vishesh-news/balasaheb-thackeray-shive-sena-supremo-11428/


Published: Sunday, November 18, 2012

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे 'हिंदुहृदयसम्राट' शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती 'व्यंगचित्रकार बाळ ठाकरे' यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला..
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. १९६० मध्ये फ्री प्रेस मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र 'शिवसेनाप्रमुख' म्हणून ओळखू लागला.. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनात जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते.. तेव्हापासून पुढे, महाराष्ट्रात आणि मुंबईत, बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे समीकरण झाले. त्यांच्या सभांना होणाऱ्या विक्रमी गर्दीमुळे अन्य राजकीय पक्षांच्या सभा फिक्या ठरत गेल्या. स्थापनेनंतरच्या पुढच्या दशकात, राज्यातील काही राजकीय पक्षांच्या सोबतीने शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरही ठसा उमटविण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात दबदबा वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक अंगिकारलेल्या राडा संस्कृतीमुळे शिवसेनेची मुंबई आणि कोकणात जबरदस्त पकड बसली. तोवर मुंबईच्या कामगार क्षेत्रावर कम्युनिस्ट आणि समाजवादी संघटनांची पकड होती. ही मोडून काढण्यासाठी सेनेने प्रसंगी दंड, भेद नीतींचाही वापर केला आणि एकहाती अंमल प्रस्थापित केला.
अमोघ वक्र्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली. राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसेनेच्या अभेद्य तटबंदीला छगन भुजबळ, गणेश नाईक आदी नेत्यांनी पक्षांतराचे खिंडार पाडले. शिवसेनेची मुलुखमैदान तोफ म्हणून राज्याच्या विधानसभेत सरकारविरुद्ध लढणारे भुजबळ पक्षाबाहेर पडल्यानंतर संघटना दुबळी होईल, ही अटकळ बाळासाहेबांनी फोल ठरविली आणि पक्षाला नवी ताकद देण्यासाठी अविश्रांत परिश्रम सुरू झाले. झंझावाती दौरे, सभा घेत आणि माणसे जोडत बाळासाहेबांनी शिवसेनेला नवी संजीवनी देण्याचा जणू ध्यास घेतला, आणि राजकीय समीकरणांचाही आढावा घेण्यास सुरुवात केली. हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात हुकुमाचा एक्का ठरणार हे बाळासाहेबांच्या जाणकार आणि द्रष्टय़ा नजरेने ओळखले आणि याच मुद्दय़ाच्या आधारावर त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करून युतीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली. तोवर राष्ट्रीय राजकारणात युती आघाडीच्या राजकारणाचा जम बसलेला नव्हता. शिवसेना-भाजप युतीचा हा प्रयोग अभूतपूर्व यशस्वी ठरला आणि १९९५ ते २००० हा काळ शिवसेना-भाजपसाठी सुवर्णकाळ ठरला. देशात आणि महाराष्ट्रातही सेना-भाजपच्या राजनीतीला जनतेचा अभूतपूर्व कौल मिळाला. महाराष्ट्रात युतीचा भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद नेते ठरले.. युतीच्या सत्ताकाळात बाळासाहेबांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे साकारून महाराष्ट्रात जिवंत झाली. दोन रुपयांत गरीबांना झुणकाभाकर देणे हे त्यांचे स्वप्न होते. युतीचे सरकार राज्यात आल्यावर ते साकारले. पुढे व्यवस्थापनातील ढिलाईमुळे ही योजना टिकाव धरू शकली नाही, पण एका क्रांतिकारी निर्णयाचे शिल्पकार म्हणून बाळासाहेबांचे नाव महाराष्ट्राच्या सत्तापटलावर कायमचे कोरले गेले. राज्यात मातोश्री वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने जपत महाराष्ट्राच्या सामाजिक व भौतिक विकासाचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला होता. यापैकी अनेक योजना साकारल्या आणि द्रुतगती मार्ग, उड्डाणपूल अशा योजनांनी महाराष्ट्राच्या विकासाची नवी दालने खुली झाली..
आक्रमक हिंदुत्वाचा आणि कडव्या मुस्लिमविरोधाचा प्रखर पुरस्कार करताना बाळासाहेब ठाकरे अनेकदा टीकेचे आणि वादाचेही धनी झाले, पण आपल्या प्रत्येक शब्दाशी ठाम राहण्याच्या स्वभावातून त्यांनी यावरही मात केली. गुळमुळीत लोकशाहीपेक्षा रोखठोक ठोकशाही चांगली असे सांगत त्यांनी अनेकदा सत्ताधीशांना धारेवर धरले. कलेची जाण असलेला हिटलर हा त्यांचा आदर्श होता, तसे ते बोलूनही दाखवत. त्यांच्या या रोखठोक स्वभावामुळेच, बाळासाहेबांच्या केवळ आदेशानिशी प्राण पणाला लावण्याची तयारी असलेल्या कडव्या शिवसैनिकांची फौज मुंबईतच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली. सन २००२ मध्ये इस्लामी दहशतवादाचे भयंकर सावट मुंबईने अनुभवल्यानंतर हिंदू आत्मघातकी पथके स्थापन करण्याच्या त्यांच्या आदेशामुळे प्रचंड खळबळ माजली. राज्य सरकारने त्यांच्यावर खटला दाखल केला. मात्र, प्रत्येक मुस्लिम आपला शत्रू नाही, तर देशविरोधी मुस्लिम शत्रूच आहे, असे ठणकावून सांगत मुंबईतील दंगलींनंतर बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुरस्कार आणखी प्रखर केला. मुस्लिम दहशतवाद हा देशापुढील सर्वात मोठा धोका आहे, हे वारंवार उघडपणे बजावून सांगताना त्यांनी राजकीय परिणामांची तमा बाळगली नाही.  राजकारणात असे तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे बाळासाहेब व्यक्तिगत आयुष्यात मात्र, खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते, हे त्यांच्या जीवनपटावरून सहज जाणवते. पत्नी मीनाताई यांचे निधन, मुलगा बिंदुमाधव यांचा मृत्यू, शिवसेनेतील राजकीय बंडामुळे दूर होणारे निकटवर्तीय अशा अनेक प्रसंगांत त्यांचे हळवेपणही महाराष्ट्राने अनुभवले. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक अशी अनेक माणसे राजकीयदृष्टय़ा दुरावली, पण बाळासाहेबांच्या मोठेपणाच्या आठवणी या नेत्यांच्या मनाच्या हळव्या कप्प्यात आजही जिवंत आहेत, त्याचे हेच कारण! मीनाताईंच्या निधनानंतर अनंकदा त्यांच्याशी बोलताना, किंवा त्यांना जनतेसोबत साधलेल्या संवादातून, मानसिकदृष्टय़ा हळवे झालेले बाळासाहेब महाराष्ट्राने अनुभवले. पुतण्या राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून स्वतचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपली वेदना लपविली, पण राज ठाकरे यांच्या विभक्तपणाचे दुख अनेकदा त्यांच्या वागण्यातून व्यक्त झालेलेही महाराष्ट्राने पाहिले. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे असे सांगत सामान्य शिवसैनिकाच्या हृदयात घर करणाऱ्या या असामान्य नेत्याने आपल्या अखेरच्या भाषणातही, त्याचाच पुनरुच्चार केला होता. माझे हृदय तुमच्यापाशी आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली.. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही अढळ राहणार आहे..   

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Welcome

Website counter

Followers

Blog Archive

Contributors